शहरात संसर्गाने टोक गाठलेले असताना उशिरा का होईना लोकप्रतिनिधी जागे झाले. सर्वपक्षीय खासदार आमदार एकत्र येत बुधवारी चिंतन बैठक घेतली. तर गुरुवारी विभागीय आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. लोकप्रतिनिधींच्या या बैठकीला मात्र माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, आमदार नारायण कुचे आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दांडी मारली. संकटाच्या काळात हे तिघे गेले कुणीकडे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात रुग्णांच्या संख्येने उच्चांकी पातळी गाठली आहे. दररोज नवनवीन वस्त्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होत आहे. विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या भागात संसर्ग वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. चिखलठाण्यासह मुकुंदवाडी, रामनगर, संजयनगर हे भाग कोरोनाचे हॉट स्पॉट बनले आहेत. अशा परिस्थितीत या परिसराचे नेतृत्व करणाऱ्या आमदार नारायण कुचे यांची अनुपस्थिती डोळ्यात खुपणारीच आहे. नगरसेवक म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या आमदार कुचे यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही का ? असा सवाल विचारला जात आहेे. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचाही मतदारसंघ शहरालगतच आहे. त्यामुळे त्यांचीही या बैठकीला उपस्थिती अनिवार्य होती. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनीही या बैठकीला दांडी मारली. अत्यंत संवेदनशील विषयावर लोकप्रतिनिधींचे असे वागणे योग्य आहे का ? असे बोलले जात आहे.